ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे सर्व माध्यमांच्या शाळा (निवासी शाळा व आश्रमशाळा वगळून) येत्या 24 जानेवारी 2022 पासून प्रत्यक्ष सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने स्थानिक परिस्थिती पाहून इयत्ता 1 ते 12 वीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशात असे म्हटले आहे की, कोवीड विषयक सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील (निवासी व आश्रमशाळा वगळून) इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्यात यावेत. त्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेण्यात यावे. तसेच ज्यांचे संमतीपत्र प्राप्त होणार नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु ठेवावेत. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित रहावे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसींच्या दोन्ही मात्रा झालेले असावे. शाळेतील 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेत करण्यासाठी शिक्षणाधिकार्यांनी संबंधित प्राधिकार्यांशी संपर्क साधून नियोजन करावेत. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.