जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे निर्देश
ठाणे (प्रतिनिधी) - कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आता प्रत्यक्षात आल्यासारखे वातावरण असून त्यावर उपाय करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या सर्व माध्यमांच्या सर्व आस्थापनांच्या ऑफलाइन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही त्यांनी तात्काळ आपले लसीकरण करून घ्यावे सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटेशनचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी केले आहे. यामध्ये मुलांचे लसीकरण करावयाचे असल्याने नागरी आरोग्य केंद्रातील अनुभवी कर्मचारीवृंद या लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास काल सुरूवात झाली. या कार्यक्रमाच उदघाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने के.वी कन्याप्रशाला पनवेल येथे करण्यात आले. याच बरोबर पालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील विविध दहा शाळांमध्येही लसीकरणास सुरूवात झाली. यावेळी महापौर डॉ.कविता चौतमोल, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी तसेच आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शिक्षण विभागाचे प्रशासकिय अधिकारी बाबासाहेब चिमणे, वैद्यकिय अधिकारी रेहाना मुजावर तसेच शाळेचे पदाधिकारी,शिक्षक ,परिचारिका, विद्यार्थी उपस्थित होते. हे लसीकरण करण्यास पनवेल महापालिक सज्ज झाली असून शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येत आहे.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1,2,3,4,5,6 अंतर्गत प्रत्येक शाळांचे दिनांक आणि वार निहाय वेळापत्रक करण्यात आले आहे. या वेळापत्रकानूसार त्या त्या शाळांमध्ये लसीकरण होणार आहे. दररोज 10 शाळांमध्ये लसीकरणासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डॉक्टर, परिचारिका,रूग्णवाहिका असणार आहेत. रोज 5 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष पालिकेने ठेवले असून सर्व शाळांचे येत्या आठ -दहा दिवसात पुर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40 हजार मुले आहेत. त्यांच्या पालकांनी प्रसिध्द केलेल्या आठवड्याच्या नियोजनातील शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी शाळेला परवानगी द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.