मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसल्यानंतर सरकारनं नियमांचं पालन करत राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याची परवानगी दिली होती.
परंतु यानंतर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. दरम्यान, आता 1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेही सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं यासंदर्भात शासन आदेशही जारी केला आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचं शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करावी अथवा नाही आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल.