नितीन पडवळ
नवी मुंबई - रेल्वेच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर दरवर्षी होणार्या अपघाती घटनांमधून बळी जाणार्यांची संख्या चिंता करायला लावणारी असते.त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मुंबई उपनगरीय लोकल सेवा ही प्रवाशांसाठी मृत्युवाहिनी ठरू लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते रबाळे व हार्बर मार्गावरील सीबीडी ते पनवेल दरम्यान गत 2021 वर्षात झालेल्या रेल्वे अपघाती घटनांमधून एकूण 146 जणांचा बळी गेला आहे. यात वाशी लोेहमार्ग पोलिस ठाणे हद्दीतील वाशी ते रबाळे या मार्गावर 11 रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या अपघाती घटनांत 124 जणांचा तर पनवेल लोहमार्ग पोलिस ठाणे हद्दीतील पनवेल मेंन लाईन, खांदेश्वर, बेलापूर, मानसरोवर व खारघर या पाच रेल्वे स्थानकांदरम्यानच्या अपघाती घटनांत 22 जणांचा झालेला मृत्यू यांचा समावेश आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हदीत जानेवारी ते डिसेंबर 2021 या गत वर्षात झालेल्या अपघाती घटनांत एकूण 124 जणांचा बळी गेला आहे. यात रेल्वे रूळ ओलांडतांना लोकलची धडक लागून सर्वात जास्त म्हणजे 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जणांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला असून 11 जणांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. यात 95 जणांच्या वारसांचा शोध लागला आहे. तर बेवारस मृतदेहांची संख्या 29 इतकी आहे. यात पुरुष मृतांची संख्या 109 तर स्त्री मृतांची संख्या 15 इतकी आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान दरवर्षी अनेक प्रवासी शॉर्टकटच्या मोहापायी रूळ ओलांडतात आणि रेल्वेगाडयांच्या धडकेत आपला जीव गमावतात. रूळ ओलांडणे धोकादायक आहे, अशी उद्धोषणा रेल्वे स्थानकात वारंवार केल्यानंतरही अनेक प्रवासी हा धोका पत्करून मृत्यूला आमंत्रण देत असतात. रूळ ओलांडताना, रेल्वे गाडयांमधून पडून, धावत्या लोकलमधून प्रवास करताना खांबाची धडक लागणे, लोकल व फलाटाच्या रिकाम्या जागेत पडणे, ऑव्हरहेड वायरचा शॉक लागणे, आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू व अन्य कारणांमुळे मृत्यू ही प्रामुख्याने रेल्वे अपघाताची कारणे आहेत. वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 11 रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. यात प्रामुख्याने गोवडी, मानखुर्द, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व रबाळे या स्थानकांचा समावेश आहे. पनवेल रेल्वे मार्गावरील अपघातात वर्ष 2019 मध्ये 78 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये ही संख्या 22 इतकी आहे. वर्ष 2020 या वर्षात घडलेल्या अपघातांमध्ये 65 प्रवाश्यांनी आपले प्राण गमावले. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडतांना झाले आहेत. वर्ष 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये नवी मुंबईतील लोहमार्गावर जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.