15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात!

 नवी मुंबईत 206, ठाण्यात 16 तर पनवेलमध्ये 10 शाळांमध्ये लसीकरण



नवी मुंबई (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात, देशातील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काल दि.3 जानेवारीपासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ झाला. त्यानुसार काल नवी मुंबईसह ठाणे व पनवेल इतर असंख्य ठिकाणी या लसीकरणास सुरुवात झाली.

नवी मुंबईत काल दिवसभरात 206 शाळांच्या केंद्रावर 8870 मुलांचे लसीकरण झाले. पनवेल महापालिका हद्दीत 10 शाळांच्या केंद्रावर हे लसीकरण झाले. तर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात एकाचवेळी 16 लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने मुलांच्या लसीकरणासाठी विशेष असे नियोजन केले आहे. महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये 3 ते 10 जानेवारी या कालावधीत लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका व खाजगी अशा एकूण 206 शाळांमधील 2007 किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या 72 हजार 823 विद्यार्थ्याचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी साधारणत: 25 हून अधिक शाळांमध्ये दररोज 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून त्याकरिता नागरी आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. (उर्वरित पान 3 वर)