25 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील!

 गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महापालिकेतर्फे मार्गदर्शक सुचना जारी



नवी मुंबई (प्रतिनिधी) - सध्या जगभरासह देशात व राज्यात ओमायक्रॉन ह्या कोविड-19 च्या नवीन व्हेरियंटचा धोका निर्माण झालेला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढु लागला असून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम,1897 नुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवे आदेश पारित केले आहेत. यात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोणातून, सहकारी गृहनिर्माण संस्थांकरीता काही मार्गदर्शक सूचना व निर्बंध लागू केले आहेत. यात प्रामुख्याने एखाद्या सोसायटीत 25 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आल्यास सदरची इमारत सील करण्यात येणार आहे.

महापालिकेने लागु केलेल्या नव्या आदेशामध्ये अ) कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एका इमारतीमध्ये एकूण 25 किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत अशा इमारतीच्या एखाद्या मजल्यावर (फ्लोअर) केवळ एकाच सदनिकेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशा ठिकाणी केवळ त्या मजल्यावरील संबंधीत सदनिका सील करण्यात येईल. तथापी कोणत्याही इमारतीच्या एकाच मजल्यावर एकापेक्षा अधिक सदनिकेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास अशा प्रकरणी त्या इमारतीचा संबंधित मजला संपूर्ण सील करण्यात येईल, ब) सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गृहनिर्माण संस्थेच्या एका इमारतीमध्ये 25 किंवा त्यापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. तसेच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरामध्ये एकापेक्षा जास्त इमारती असतील अशा गृहनिर्माण संस्थेबाबत वरील नमूद अ व ब नुसार कार्यवाही केली जाईल. अशा प्रकरणी देखील केवळ बाधित असलेल्या इमारतीचे प्रवेशव्दार सील केले जाणार असून मुख्य प्रवेशव्दार सील केले जाणार नाही.

कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत किंवा मजला किंवा सदनिका सील करतांना, त्या इमारतीमधील सर्वात शेवटी कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची ज्या दिवशी कोविड चाचणीकरीता स्वॅब घेण्यात आलेले आहे. त्या दिवसापासून गणना करुन पुढील सात दिवसापर्यंत सदर इमारत किंवा मजला किंवा सदनिका सील करण्यात येईल. सात दिवसाचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर इमारत खुली करण्यात येईल.

दरम्यान, महापालिकेने जारी केलेल्या उपरोक्त मार्गदर्शक सुचना व निर्देशांचा, जर एखादया गृहनिर्माण संस्थेने भंग केल्यास पहिल्या वेळेस दहा हजारांचा तर दुसर्‍या वेळेस रक्कम रुपये 25 हजार व तिसर्‍या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रु. 50,000/- इतका दंड आकारण्यात येणार आहे. घरगुती काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्यास त्यांना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या सदनिका,मजला व इमारत सोडून इतरत्र प्रवेश देता येईल. उक्त आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संघटना व संस्था यांच्यावर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता यामधील कलम 188 अन्वये कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्तांकडून देण्यात आला आहे.