31 डिसेंबरच्या अंमली पदार्थ विक्रीचा बेत उधळला नवी मुंबई पोलिसांकडून अडीच कोटींचे ड्रग्ज जप्त



 नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुुंबई पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर तरुणाईसाठी पाटर्यांमध्ये वापरात येणार्‍या तब्बल 2 कोटी 50 लाख रूपये किंमतीचा एमडी या अंमली पदार्थ पावडरचा साठा जप्त केला असून या अंमली पदार्थांची निर्मिती करणारी पोयनाड (अलिबाग) येथील फॅक्टरीही सिल केली आहे. पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी याबद्दलची माहिती काल पत्रकार परिषदेत देत या गुन्हयाचा अजून खोलवर तपास सुरु असल्याची माहिती दिली.

गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने धडक कारवाई करीत तालुक्यातील नेरे वाजे रोडवर एका इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडून जवळपास मारुती गाडीसह मेथ्यॉक्युलॉन पावडर (एमडी) हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी, 31 डिसेंबरच्या पाटर्यांसाठी तरुणांना विकण्यासाठी ड्रग्ज आणणारा कलिम रफिक खामकर नावाच्या मुख्य आरोपीसह त्याच्या दोघा साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह व अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये यांनी नशा मुक्त नवी मुंबई ’ या अभियानाचे अनुषंगाने अंमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार गुन्हेशाखा पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे, व सहाय्यक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून ड्रग्ज माफियांचा शोध घेण्यात येत होता. त्यानुसार बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन गुन्हेशाखा कक्ष 3, अंमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरित्या कारवाई करुन 31 डिसेंबरच्या पाटर्यांसाठी तरुणांना विकण्यासाठी ड्रग्ज आणणारा इसम कलिम रफिक खामकर (39) रा. पनवेल, यास एमडी या अंमली पदार्थासह नेरे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीतून पुढे त्याचे सहकारी जकी अफरोज पिट्टु (33), रा. पनवेल व सुभाष रघुपती पाटील (40) रा. पेण, जि. रायगड या दुकलीस सदर गुन्हयात ताब्यात घेवून नमुद दोघांकडून एकूण 2 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 2 किलो 500 ग्रॅम एम डी ड्रग्ज” हा अंमली पदार्थ जप्त केला. 

याप्रकरणी उपरोक्त आरोपीिंवरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे प्रथमच एम डी ड्रग्ज” तयार करण्याचा कारखाना शोधण्यात पोलिसांना यश आले असुन तो सिल करण्यात आला आहे. सदर कारवाईत  एम.डी. ड्रग्जसह पांढर्‍या रंगाची मारुती स्वीफ्ट, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 53 लाख 70 हजार 900 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हेशाखा कक्ष-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी,अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि बी एस सय्यद, एएचटीयुचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनावणे, एपीआय सागर पवार, पोलिस हवालदार मोरे,कोळी, पाटील, जेजूरकर, फुलकर, बोरसे, सोनवलकर, तसेचपीएसआय विजय शिंगे, इनामदार, उटगीकर, पिरजादे, कांबळे आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.