न्यायालयीन निकालावर उघड आक्षेप... वाशीतील इमारतींच्या पूनर्विकासावर भाजप पदाधिकार्‍यांची आगपाखड!

 


वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पूनर्बांधणीवरुन एकीकडे श्रेयाचे राजकारण अधूनमधून पेटत असताना वाशीतील पूनर्विकास प्रकल्पाबद्दल भाजपच्या दोघा पदाधिकार्‍यांनी उघडपणे आपला आक्षेप बोलून दाखवत हा प्रकल्प म्हणजे बिल्डरने शासन यंत्रणेला व न्यायालयालाही मॅनेज करुन बांधकाम सुरु केल्याची आगपाखड केली आहे. मोबाईल संभाषणातून झालेला या पदाधिकार्‍यांचा संवाद समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. तर वाशीतील पूनर्विकासात पुन्हा विघ्न निर्माण करण्यासाठी काही लोकांकडून अशा पध्दतीने गैरसमज पसरविला जात असल्याची प्रतिक्रिया या पूनर्विकासात महत्वाची भुमिका बजावणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक किशोर पाटकर यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या महिला मोर्चा पदाधिकारी मंगल घरत यांच्या नेरुळ विभागात सुध्दा पूनर्विकासाचे वारे वाहत आहे. या अनुषंगाने त्यांनी वाशीतील भाजप कार्यकर्ते सुरेश शिंदे यांना भ्रमणध्वनी करीत श्रध्दा सोसायटीच्या पूनर्विकासाबद्दलची माहिती घेतली. या दोघा पदाधिकार्‍यांनी केलेल्या संभाषणात मध्ये सुरेश शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी श्रध्दा सोसायटीचे पूनर्विकासाचे काम  थांबावे, जूने बांधकाम पाडले जावू नये, प्रत्येक सदस्यांसोबत व्यक्तीगत करारनामे व्हावेत अशा काही मागण्यासाठी सिडको, मनपा, न्यायालय सर्वत्र दाद मागून सुध्दा कुणीही आपले म्हणणे एकून घेतले नसल्याचे व विकासकांसोबत सर्वच मॅनेज झाल्याचे वक्तव्य या संवादात केले आहे. शासनाच्या नियमानुसार व्यक्तीगत करारनामे बंधनकारक असताना सिडको, मनपा यांनीही शासनाच्या नियम अटींकडे दुर्लक्ष करुन बिल्डरांची पाठराखण केली तर या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो तर न्यायमूर्तींनी आमचे काहीही एकून न घेता बिल्डर-विकासकांना फायदा होईल असा निर्णय दिला. सोसायटीमधील सोबतचे लोक जे विकासकाला विरोध करत आमच्या बाजूने उभे होते ते लोकही पुढे पुढे विकासकाला जावून मिळाले. शेवटी आम्हीच किती विरोध करणार म्हणून आम्हीही आमची घरे विकून सोसायटीमधून बाहेर पडलो असे या संवादात सुरेश शिंदे यांनी म्हटले आहे. या व्हायरल क्लीपमधून सिडको, महापालिका व न्यायालय या तिन्ही यंत्रणांवर आक्षेपार्ह टिका करण्यात आली आहे.