पनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील दुकानावरील पाट्या मोठ्या अक्षरात मराठीत लावण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिका हद्दीतील सर्वच दुकानधारकांना विशिष्ट वेळ देऊन पालिकेच्या माध्यमातून पाट्या मराठीत लावण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने करावे अन्यथा, युवा सेना आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरुन कारवाई करेल असा इशारा पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून युवा सेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांनी दिला आहे.
यावेळी विधानसभा अधिकारी पराग मोहीते, पनवेल शहर अधिकारी सनी टेमघेरे, खारघर शिवसेना संघटक रामचंद्र देवरे, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव नवीन पनवेल अधिकारी निखील दिघे, युवा सेना अधिकारी संकेत पाटील, सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.याबाबत बोलताना युवासैनिकांनी सांगितले की, पनवेल महापालिकेने आपल्या हद्दीतील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी आवाहन करावे व ठराविक मुदतीमध्ये दुकानदारांनी सर्व फलक शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मराठी लावावेत, तद्पश्चात ही मुजोर दुकानदार प्रशासनाचा निर्णय मानत नसतील तर त्यांच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करून पाट्या मराठीत लावण्यास भाग पाडू व त्याची सर्वस्वी जबाबदारी दुकानदारांची असेल, असा इशाराही युवा सैनिकांनी दिला आहे.