नवी मुंबई (नितीन पडवळ) - शहरात रस्त्यांचे जाळे तयार करणे हे विकासासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, रस्त्यांसोबतच वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचा समतोल साधने तेवढेच महत्त्वाचे आहे. ही बाब विशेषत्वाने लक्षात घेण्याची असतानाही शहरातील सौंदर्य वाढीस लागावे याहेतुने केल्या जाणार्या विविध सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे शहरातील फुटपाथलगत असलेल्या व इतर विविध ठिक़ाणच्या वृक्षांचा गळा आवळण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव असून याबाबत पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्ते, पदपथांवर होत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे झाडांची मुळे वाढण्यास अटकाव होतो आणि वारा-वादळ किंवा थोड्याशा पावसातही मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. असे प्रकार थांबवण्यासाठी वृक्षांच्या मुळांना मोकळा श्वास घ्यायला मिळावा, बुंध्याच्या सभोवती माती असावी, त्यांना काँक्रिटमुक्ती मिळावी, यासाठी प्रशासनाकडून कंत्राटदारांना वेळोवेळी सूचना देण्यात येतात. मात्र, संबंधित काम घेणारेयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. आजमितीस नवी मुंबई शहरातील विविध परिसरातील फूटपाथवरील वृक्षांना सिमेंटचा फास आवळण्यात आल्याचे चित्र दिसून येते.या झाडांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी आजुबाजुचे सिमेंटीकरण काढून त्यांच्या मुळांपर्यंत पाणी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.