सामानाची वाहतूक करतांना प्रवाशांची होतेयं दमछाक
पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल रेल्वे स्थानकात अधिकृत परवानाधारक हमालांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे. याचा परिणाम म्हणून या स्थानकातून प्रवास करणार्या वयोवृध्द नागरिक व महिला यांना ये-जा करण्यासाठी तसेच सामानाची वाहतूक करतांना मोठ्या प्रमाणात दमछाक सहन करावी लागत आहे.
अधिकृत परवानाधारक हमालांच्या कमी संख्येमुळे नागरिकांना होणार्या त्रासाची बाब लक्षात घेवून ही समस्या सोडविण्यासाठी पनवेल प्रवासी संघाकडून वर्ष 2017 पासून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र महत्वाच्या अशा या समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे झेड आरयुसीसीचे सदस्य अभिजीत पाटील यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना पत्र पाठवून हा विषय संबंधित रेल्वे प्रशासनाकडे तातडीने मांडावा, जेणेकरुन प्रवाश्यांना चांगली सुविधा प्राप्त होईल अशी मागणी केली आहे.