नवी मुंबई (प्रतिनिधी) - 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार्या आशियाई फेडरेशन ऑफ कॉन्फेडरेशन आयोजित एएफसी महिला आशियाई फुटबॉल चषक 2022 स्पर्धेचे यजमानपद मुंबई, पुण्यासह नवी मुंबई शहर भूषवित आहे. क्रीडानगरी म्हणूनही नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईत या माध्यमातून जगभरातील नामांकित महिला फुटबॉलपटू येत असून त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज झालेले आहे. त्यानुसार विविध चौक, मोक्याची ठिकाणे येथे भित्तीचित्रे, शिल्पाकृती याव्दारे फुटबॉल खेळाची वातावरण निर्मिती झाली असून मोठ्या होर्डींगव्दारे व्यापक प्रचारही करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नेरूळ से- 19 येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणांत निर्मिलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल ग्राऊंडही सराव सामन्यांसाठी सज्ज करण्यात आलेले आहे.
कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करीत या स्पर्धा खेळविल्या जात असून या निमित्ताने फुटबॉल या सर्वाधिक देशात खेळल्या जाणार्या सर्वात लोकप्रिय खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा तसेच महिला फुटबॉलपटूंचा व त्या माध्यमातून स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने एएफसी महिला आशियाई फुटबॉल स्पर्धेविषयीची सचित्र माहिती देणारा अभिनव चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे.
या चित्ररथाचा काल आशियाई फेडरेशन ऑफ कन्फेडरेशनच्या (एएफसी) प्रकल्प संचालक नंदिनी अरोरा यांच्याहस्ते फ्लॅग ऑफ करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे, क्रीडा विभागाचे उपायुक्त मनोज महाले, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रणी असलेल्या नवी मुंबई महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्ररथाच्या निर्मितीतही ’थ्री आर’ प्रणालीतील ’रिसायकल’ तत्वाचा अंगिकार करण्यात आला आहे. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी आणि नामवंत कलाकार अमोल ठाकूरदास यांच्या कला दिग्दर्शनाखाली नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या वापरात नसलेल्या एनएनएमटी बसचे रुपांतर प्रचाररथ स्वरुपात करण्यात आले आहे. हा फुटबॉल प्रचाररथ संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरवला जाणार आहे. या चित्ररथात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्या आशिया खंडातील विविध देशांच्या महिला फुटबॉल खेळाडूंची छायाचित्रासह माहिती पॅनलव्दारे प्रदर्शित करण्यात आलेली आहे. याशिवाय एएफसी स्पर्धेविषयीची संपूर्ण माहिती तसेच यावर्षीच्या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई तसेच पुण्यात होणार्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कामगिरीचा आढावा घेणारे चित्र माहिती फलक तसेच फिफा स्पर्धेचीही माहिती देण्यात आलेली आहे. अत्यंत आकर्षक स्वरूपात सजवलेल्या या चित्ररथाच्या दोन्ही दर्शनी बाजूवर महिला फुटबॉलपटूंचे छायाचित्र तसेच इतर माहिती देण्यात आलेली आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून माझी वसुंधरा तसेच स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेशही प्रसारीत करण्यात येत आहे. या चित्ररथाच्या आतील बाजूस असलेल्या स्क्रीनवर खेळाडूंमध्ये जोश भरणारी जिंगल्स तसेच ध्वनीचित्रफितीही प्रदर्शित केल्या जात आहेत. अमोल ठाकूरदास यांनी शब्दबध्द केलेल्या या मराठी आणि हिंदी गाण्यांना प्रसिध्द संगीतकार प्रणय प्रधान यांनी संगीत दिले आहे. गायिका शिबानी दास आणि प्रणय प्रधान यांनी ही जिंगल्स गायलेली आहेत.
एएफसी महिला आशियाई फुटबॉल चषक-2022 ची जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेला हा अभिनव चित्ररथ अत्यंत लक्षवेधी असून 6 फेब्रुवारीपर्यंत या चित्ररथाव्दारे स्पर्धेचा व त्या माध्यमातून फुटबॉल खेळाचा व्यापक प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे.