लॅटव्हियाची दिऐना मर्सिनकेव्हिका उपविजेती
नवी मुंबई (प्रतिनिधी)- आ. गणेश नाईक यांच्या पुढाकाराने एनएमएसए क्लबच्यावतीने आयोजित यावर्षीच्या वुमेन्स आयटीएफ स्पर्धेची विजेती रशियाची एकातेरिना रेनगोल्ड ही ठरली. तर उपविजेतेपदाचा मान लॅटव्हियाची दिऐना मर्सिनकेव्हिका हिने पटकावला आहे. एनएमएसएचे अध्यक्ष तथा आ. गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे, कमिटी सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. देशातील आणि परदेशातील एकुण 70 नामांकित खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. या स्पर्धेच्या निमित्ताने उगवत्या खेळाडूंना जागतिक दर्जाचा टेनिसपटूंचा खेळ नवी मुंबईत पाहता आला. एनएमएसएने जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांचा विकास केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे आयोजन करण्याची संधी या क्लबला मिळते आहे.
दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये नवी मुंबईत होणारी आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेसाठी देखील एनएमएसएमधील सुविधा वापरण्यात येणार आहे. कोरोनाची पूर्ण खबरदारी घेत क्लबची कमिटी आणि सदस्यांनी स्पर्धा यशस्वी केल्याबददल आ. गणेश नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले. खेळामुळे सदभावना, प्रेम आणि माणुसकी वाढीस लागले, असे मत त्यांनी यावेळी मांडले.