लोकनेते दि.बा.पाटील फेलोशिप संदर्भात मनसेची बैठक संपन्न

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने लोकनेते दि.बा.पाटील फेलोशिपची घोषणा करण्यात आली होती. सदर फेलोशिपच्या बोधचिन्हाचे अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या फेलोशिपची पुढील ध्येय व धोरणे ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन काल नवी मुंबईमध्ये करण्यात आले होते.  

यावेळी मनसे नेते व फेलोशिपचे प्रमुख मार्गदर्शक अनिल शिदोरे, मनसेचे आमदार व लोकनेते दि.बा. पाटील फेलोशिपचे मुख्य समन्वयक राजू पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ट्विटर पेज आणि फेसबुक पेजचे अनावरण समिती प्रमुखांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष व फेलोशिपचे समन्वयक गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

याप्रसंगी लोकनेते दि. बा.पाटील फेलोशिप निवड समितीच्या अध्यक्षपदी कवी अरुण म्हात्रे यांची नेमणूक करण्यात आली, त्याचबरोबर बैठकीस ज्येष्ठ  पत्रकार व निवड समितीचे सदस्य सारंग दर्शने उपस्थित होते. तसेच दीपक पवार, अ‍ॅड. असीम सरोदे व सुरेखा दळवी यांची देखील निवड समितीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली असल्याचे गजानन काळे यांनी जाहीर केले. या बैठकीमध्ये फेलोशिपचे वेळापत्रक, अटी व शर्ती, नियमावली, फेलोशिपचे विषय, सदरची फेलोशिप किती लोकांना देण्यात येणार, फेलोशिप धारकांचे मानधन या व अश्या अनेक विषयांवर चर्चा करून लोकनेते दि. बा. पाटील फेलोशिपला अंतिम स्वरूप देण्यात आले. या बैठकीसाठी स्थानिक समिती सदस्य अ‍ॅड.अक्षय काशीद, सविनय म्हात्रे, भूषण कोळी, संदीप गलुगडे, श्रीकांत माने, आप्पासाहेब कोठुळे, श्याम कोळी, अनिकेत पाटील, प्रसन्न बनसोडे, अ‍ॅड.भूषण बारवे, सतीश गाडगे उपस्थित होते.