एपीएमसीत ट्रकला बांधून ठेवलेल्या माकडाची यशस्वी सुटका!

 

तुर्भे (प्रतिनिधी)- एपीएमसी मार्केटमध्ये ट्रकला लोखंंडी साखळीने बांधून ठेवलेल्या एका लहान माकडाची ट्रक चालक व क्लीनरच्या तावडीतून सुटका करण्यात भूमी जीवनदय संवर्धन ट्रस्ट नावाच्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांना यश आले आहे. 

भूमी जीवनदय संवर्धन ट्रस्टचे संस्थापक सागर सावला यांना एपीएमसी घाऊक बाजारात काम करणार्‍या आशिष भानुशाली यांनी फोन करून या प्रकाराबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर सदर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी स्थानिक एपीएमसी पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती घटनास्थळी जावून पाहणी केली असता,सदरचे माकड त्याच्या नैसर्गिक वातावरणात नसल्याने तणावग्रस्त दिसत होते, ट्रस्टचे संस्थापक सागर सावला यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांनी ठाणे परिक्षेत्र वनअधिकारी यांना फोन करून याबाबतची माहिती दिली असता, अधिकार्‍यांनी  सावला यांना लहान माकडास ताब्यात घेण्याची आणि त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याची परवानगी दिली. याबाबत ट्रस्टच्या सदस्यांनी ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरकडे सदरचे लहान माकड कसे मिळवले याबाबतची विचारपूस केली असता,  ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत आणि त्यांनी फक्त माकड हे त्यांचे पाळीव प्राणी असल्याचे सांगितले. यावर ट्रस्टच्या सदस्यांनी ट्रक क्लीनर व चालक यांना, माकड हे वन्यजीव अंतर्गत संरक्षित प्रजाती असल्याचे सांगताच त्यांनी सदरचे माकड भूमी जीवनदय ट्रस्टच्या स्वाधीन केले. सदरसुटका केलेल्या माकडाची काळजी भूमी जीवनदय ट्रस्टकडून घेतली जात असून येत्या काही दिवसांत वनविभागाला याबाबतचा अहवाल देऊ असे सावला म्हणाले.