डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नवी मुंबईतील स्मारक भावी पिढीसाठी विचारांचे ऊर्जापीठ - साहित्यिक उत्तम कांबळे

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील तसेच जगभरातील विविध स्मारके पाहिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांशी समरस झालेले असून उद्याच्या पिढीसाठी हे स्मारक विचारांचे विद्यापीठ होईल असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सुप्रसिध्द साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला.

ऐरोली से-15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ’ग्रंथ घडविती माणूस’ या विषयावरील व्याख्यान प्रसंगी विचारामुळे माणूस घडतो व ग्रंथ त्याच्या आयुष्याला आकार देतात असे मत व्यक्त करीत वाचन म्हणजे केवळ पुस्तकातील शब्द व अक्षरे यांचे वाचन नाही तर वाचलेल्या गोष्टींचे मनन, चिंतन म्हणजे पूर्णार्थाने वाचन आहे असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भवताल वाचता वाचता, आतले मन वाचायचे हे वाचनाचे ढोबळ मानाने दोन प्रकार असल्याचे सांगत माणूस स्वत:ला वाचत गेला व त्यातूनच लिहित गेला असा वाचन प्रवास त्यांनी कथन केला. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर ग्रंथ केवळ शब्दांची गोळाबेरीज करीत नाहीत, तर मनातले भय व शंका दूर करतात अशा शब्दात ग्रंथांचे महत्व अधोरेखीत करीत ग्रंथ हे भविष्यातील विकासाची प्रेरणा असतात हे सांगताना त्यांनी त्यांच्या लहानपासूनचे अनेक अनुभव कथन केले.

आपले वर्गमित्र माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्यासारखे वक्तृत्व स्पर्धांमध्ये आपल्याला बोलता यायला हवे हा ध्यास घेऊन शिक्षिकेने सल्ला दिल्याप्रमाणे दिवसाला 1 पुस्तक याप्रमाणे सतत 2 वर्षे 750 हून अधिक विविध विषयांवरील पुस्तकांचे मन लावून वाचन केल्यानंतर आपण घडलो असा स्वानुभव कथन करीत उत्तम कांबळे यांनी पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब एकमेव व्यक्तीमत्व होते असे सांगत तशा प्रकारचा ध्यास घेऊन वाचन करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.