नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याहस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अनंत जाधव तसेच विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करीत दरवर्षी साजरा केल्या जाणार्या पत्रकार दिनाच्या माध्यमातून लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांशी संवाद साधता येतो याचा आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने केल्या जाणार्या नाविन्यपूर्ण कामांची, प्रकल्पाची माहिती जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचविण्यासाठी पत्रकारांच्या लाभत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच पत्रकार कक्षाच्या अनुषंगाने अपेक्षित असलेल्या विविध सुविधांची पूर्तता करण्याचे काम केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.