नवी मुंबई (प्रतिनिधी) - स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जात असतांना शहर सुशोभिकरण कामांना गती द्या असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबतच्या आढावा बैठकीप्रसंगी अभियांत्रिकी विभागास दिले आहेत.
’स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशातील मोठया शहरामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान संपादन करताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भिंती, उड्डाणपूल, अंडरपास यावरील रंगचित्रे, मुख्य चौकातील शिल्पाकृती, कारंजे अशा विविध गोष्टींनी शहराचे रुप आधिक सुंदर झाल्याचे अभिप्राय येथील नागरिकांप्रमाणेच शहराला भेटी देणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व प्रवाशांकडून देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणांच्या मानांकनात व पुरस्कार चित्रफितीमध्येही याचा विशेष उल्लेख करण्यात आला. या अनुषंगाने यावर्षी ’स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला उत्साहाने सामोरे जाताना मागील वर्षीच्या सुशोभिकरण संकल्पनांमध्ये नाविन्यपूर्णता आणत शहराचे स्वरुप अधिक आकर्षक करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या होत्या. याबाबतचा आढावा घेताना शहरात सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची छायाचित्रे अवलोकन करीत आयुक्तांनी या कामाला गती देण्याचे निर्देश दिले.
या आढावा बैठकीप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड आणि इतर कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
’स्वच्छ सर्वेक्षण 2022’ च्या अनुषंगाने सुशोभिकरण कामे करताना मागील वर्षी काढलेली व अजूनही चांगल्या स्थितीत असलेली भिंतीचित्रे पाण्याने स्वच्छ करुन घ्यावीत व आवश्यक त्या दर्शनी ठिकाणी नवीन चित्रे काढावीत आणि त्यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक भागाला समाविष्ट करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. नव्याने काढावयाच्या भिंतीचित्रांमध्ये नवनवीन नजरेत भरतील अशा आकर्षक चित्र संकल्पना साकाराव्यात अशाही सूचना त्यांनी केल्या. यावर्षीही नव्या संकल्पनांसह जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विदयार्थ्यांप्रमाणेच इतरही कला महाविदयालयांच्या विदयार्थ्यांना या कामात सहभागी करुन घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात नवी मुंबईत होणार्या 17 वर्षाखालील आशियाई महिला फुटबॉल चषक स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील विविध देशातील महिला फुटबॉलपटू नवी मुंबईत येणार आहेत.या अनुषंगाने सुशोभिकरणामध्ये फुटबॉल खेळाच्या चित्र व शिल्पांचा समावेश शहरातील मुख्य ठिकाणी सुशोभिकरण कामात करावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.
विशेषत्वाने सायन पनवेल महामार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहतूक होत असून त्याठिकाणची सुशोभिकरण कामे अधिक कल्पकतेने करावीत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.