पालकमंत्री अदिती तटकरे यांचे आदेश
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको व एमआयडीसीच्या धोरणामुळे गेली 2 महिने गव्हाण, न्हावा, न्हावाखाडी, बेलपाडा, कोपर, शेलघर, शिवाजीनगर गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हजारो महिला वर्ग संतप्त झालेला आहे. या संदर्भात रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मागणी नुसार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एमआयडीसी, सिडको व नवी मुंबई महापालिका अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक खा.सुनिल तटकरे व महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत बोलावली होती. या बैठकीप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गव्हाण न्हावा गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले.
यावेळी स्थानिक भूमिपुत्रांना गेली 35-40 वर्षे सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा सिडको - एमआयडीसी व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या पाणी वाटप करार न पाळल्यामुळे नाहक या गावांचा व ओ. एन. जी. सी. सप्लाय बेसचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आलेला आहे. हा प्रश्न गांभीर्याने घेत पालकमंत्र्यांनी व खासदारांनी सर्व अधिकार्यांना सज्जड दम भरला व तुमच्या अनागोंदी कारभारामुळे प्रकल्पग्रस्त पाण्यासाठी वंचित असता कामा नये, व तातडीने न्हावा - गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करा असे आदेश दिले.
भविष्यात सिडको हद्दीतील वाढणारी लोकसंख्येला मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर जानेवारी महिन्यात संबंधीत मंत्री, अधिकार्यांची बैठक बोलावून रानसई धरणाची उंची वाढवणे. बाळगंगा व इतर पुनाडे, उरण धरणांचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक बोलावून चर्चा केली जाईल असे सांगितले. यावेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता कैलास शिंदे, न्हावा माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाणच्या महिला सरपंच माई भोईर,किरण पाटील उपसरपंच न्हावा, विजय घरत उपसरपंच गव्हाण आदि उपस्थित होते.