नवी मुंंबई (प्रतिनिधी) - मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्हयानंतर मागील पाच वर्षापासून फरार असलेल्या सराईत सोनसाखळी व दुचाकी चोरट्यास मानपाडा पोलिसांनी आंबिवली येथील इरानी वस्तीत छापा टाकून जेरबंद केले आहे. हसनैन गुलामरजा सैय्यद उर्फ इरानी (28 वर्षे) रा. पाटील नगर इरानी वस्ती आंबिवली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपीने मानपाडा पोलिस ठाण्यासह शिवाजीनगर, नवी मुंबईतील रबाळे, अंबरनाथ, नारपोली, भिवंडी आदी पोलिस ठाण्यांसह कर्नाटक राज्यातील बैंगलोर सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीसह दुचाकी चोरी व बतावणी करत लुटण्याचे गुन्हे केले आहेत. सदर आरोपीने एकूण आठ गुन्हयांची पोलिसांसमोर कबूली दिली असून, त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन मोबाईल फोन, दोन दुचाकी व 30 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हसनैन गुलामरजा सैय्यद उर्फ इरानी याच्याविरोधात यापूर्वी नवी मुंबईतील खांदेश्वर व खारघर तसेच कल्याणमधील खडकपाडा, कल्याण, वागळे इस्टेट, सातारा शहर पोलिस ठाणे, सातारा, हडपसर, कोथरूड व पुणे पोलिस ठाणे अशा विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 20 गुन्हे दाखल आहेत.
अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, एसीपी जे.डी.मोरे व मानपाडा पोलिस ठाण्याचे पीआय शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल भिसे, पीएसआय सुनील तारमळे, पोलिस हवालदार सुधीर कदम,सोमनाथ टिकेकर, संजू मासाळ,सुधाकर भोसले, कसबे,महिला पोलिस नाईक रश्मी पाटील, सोनाली किरपण व इतर आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.