नवघर रस्त्याची दुरवस्था...!

 


जेएनपीटी (वार्ताहर) - रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवघर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम 2021 - 22 मध्ये हाती घेण्यात आले.परंतु ठेकेदारांनी सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केल्याने या रस्त्याची अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीनंतर दुरवस्था झाली आहे.तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागवड केलेल्या नारळाच्या झाडांचे अस्तित्वही संपुष्टात आले असल्याने सदर कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील नवघर गावाच्या परिसराचा औद्योगिक दृष्ट्या विकास झाल्याने या गावाच्या परिसरात नागरीकांची, कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. परंतु उरण- पनवेल या मार्गावरून नवघर गावाकडे जाणार्‍या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास वाहन चालक, प्रवासी नागरीक यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम रायगड जिल्हा परिषद व सिडकोने हाती घ्यावे यासाठी नवघर गावचे सुपुत्र तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सातत्याने रायगड जिल्हा परिषद व सिडकोकडे मागणी केली.सदर मागणीची दखल घेवून रायगड जिल्हा परिषदेने नवघर गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या डांबरी करणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. सदर रस्त्याच्या डांबरी करणाचे काम ठेकेदारानी 2021 या वर्षी हाती घेतले. परंतु रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे सध्या हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे  रस्त्यातून मार्गक्रमण करणार्‍या वाहनचालकांना तसेच नागरिकांना अपघाताचा,धुळीचा सामना करावा लागत आहे.तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागवड केलेेली नारळाची झाडे पाण्याअभावी नष्ट झाली आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता सदर रस्त्याचा ठेका घेणार्‍या ठेकेदारांची व रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.