‘हर घर दस्तक’आणि ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिम...!

 नवी मुंबईत 55 हजारांहून अधिकांचे लसीकरण


नवी मुंबई (प्रतिनिधी) - शासनाने राबविलेल्या कोव्हीडविषयक विविध उपक्रमांत नवी मुंबई महापालिकेने नेहमीच उत्तम कामगिरी केली असून यामध्ये एक महत्वाचा उपक्रम म्हणजे ’हर घर दस्तक मोहीम’. या मोहीमेंतर्गत घराच्या उंबर्‍यापर्यंत पोहचून 11 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत 55 हजार 296 व्यक्तींचे घराजवळच लसीकरण करण्यात आले आहे.

या मोहिमेची शहरात 859 सत्रे राबविण्यात आली असून 18 वर्षावरील 18481 नागरिकांना पहिला डोस तसेच 36780 नागरिकांना दुसरा डोस आणि 35 नागरिकांना प्रिकॉशन डोस अशाप्रकारे 55296 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमाप्रमाणेच ‘लसीकरण आपल्या दारी’ या संकल्पनेतून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मार्केट, रेल्वे स्टेशन्स्, बस डेपो अशा मोक्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका अथवा रुग्णवाहिकेत रुपांतरित केलेल्या बसेस उभ्या करुन त्या ठिकाणीही लसीकरण करण्यास 20 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत 623 ठिकाणी 13204 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

याशिवाय 5 रेल्वे स्थानकांवरही कोव्हीड टेस्टींग केंद्रांप्रमाणेच कोव्हीड लसीकरण केंद्रेही कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. 11 नोव्हेंबरपासून वाशी व नेरुळ, 12 नोव्हेंबरपासून घणसोली तसेच 30 नोव्हेंबरपासून ऐरोली आणि 2 डिसेंबरपासून कोपरखैरणे रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या 5 रेल्वे स्टेशन्सवरील 208 लसीकरण सत्रात 17831 नागरिकांनी कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. 15 ते 18 वयोगटातील कुमारवयीन मुलांच्या लसीकरणामध्येही 65498 मुलांचे लसीकरण करून 89.26 टक्के इतके उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवसात 100 टक्के उदिदष्ट साध्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान, कोव्हीड लस अत्यंत सुरक्षित असून ती घेतल्यानंतरही जर कोरोनाची लागण झाली तरी त्याची तीव्रता मर्यादित राहते असे विशेषत्वाने निदर्शनास येत असून ज्या नागरिकांचा कोव्हीड लसीचा दुसरा डोस घ्यायचा राहिला असेल त्यांनी विहित कालावधीत तो लगेच घ्यावा तसेच आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व कोमॉर्बिडिटी असणारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनीही दुसरा डोस घेऊन 9 महिने / 39 आठवडे झाल्यानंतर अधिक संरक्षण देणारा कोव्हीड लसीचा तिसरा डोस म्हणजे प्रिकॉशन डोस लगेच घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.