गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पो.उपअधिक्षक अजयकुमार लांडगे यांना राष्ट्रपती पोलिस पदकाचा बहुमान


 नवी मुंबई(प्रतिनिधी) - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलातील शौर्य, गुणवत्तापूर्ण सेवा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणार्‍या राष्ट्रपती पदकांची सोमवारी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस सेवेतील एकूण 51 पोलिसांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यातील चार पोलिस अधिकार्‍यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक पुरस्कार, 7 पोलिसांना शौर्य पदक पुरस्कार तर 40 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हा बहुमान प्राप्त झाला आहे. 

यात राज्य पोलिस दलात गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल नक्षल विरोधी अभियान, नागपूरचे पोलिस उपअधिक्षक अजयकुमार लांडगे यांना राष्ट्रपती पोलिस पदकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. दरम्यान,नागपूरचे पोलिस उप अधिक्षक असलेले अजयकुमार लांडगे यांनी नवी मुंबईत कार्यरत असतांना आपल्या कामाचा ठसा उमटवित विविध गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी पार पाडली होती. त्यांना राष्ट्रपती पदकाचा बहुमान प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाशी, पनवेल पोलीस ठाणे निरिक्षक म्हणून त्यांनी दमदार कामगिरी बजावली होती.