विविध मागण्यांसाठी आरपीआय शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)-नवी मुंबईतील विविध प्रलंबीत मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले ) वतीने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असताना नवी मुंबई शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही याबाबत सकारात्मक आश्वासन देत लवकर स्थळपाहणी करून जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवणार असल्याचे सांगून लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई शहरात बसविला जाईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका शेजारील पूर्वेकडील मैदान हे स्मारकासाठी मिळावे  व स्मारकातील हॉल सामाजिक संस्थेला नियमावली तयार करून प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी लवकरात लवकर नियमावली तयार करून सामाजिक संस्थेला हॉलचा वापर करता येईल असे आश्वासन दिले.  नवी मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी नवी मुंबईतही सुपर स्पेशालिस्ट सुविधा असलेले हॉस्पिटल असावे म्हणून वाशी येथील हॉस्पिटल येथे सुपर स्पेशालिस्ट सोय, एमआरआयची सोय व तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी, नवी मुंबईतील झोपडीधारकांना ओळखपत्र अद्याप दिले नाही. अपात्र झोपडीधारकांना पात्र करणे व 2011 पर्यंतच्या वाढलेल्या झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याबाबत कारवाई करावी, कोरोना काळात भरमसाठ फी आकारणार्‍या व शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी. तसेच श्रद्धा व एकता या सोसायटीची सुनावणी लवकरात लवकर घेऊन  श्रद्धा एकताची सीसी रद्द करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत आयुक्तांनी सकारात्मक असे आश्‍वासन दिले असल्याचे सांगण्यात येते. यावेळी शिष्टमंडळात मराठा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, युवा नेते यशपाल ओहोळ, नंदा गायकवाड, बाबा माने, शशिकांत कासारे, मुकेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.