बलात्कार्‍यांना जागेवर फाशी द्या!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)- बलात्कार्‍यांना जागेवर फाशी द्या असे मत सिने अभिनेत्री दीपाली भोसले -सय्यद यांनी कोपरखैरण्यात व्यक्त केले. 

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबईतील कोपरखैरण्यात सुरु झालेल्या डीबीएस महिला दक्षता पथक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याहस्ते रविवारी संपन्न झाले. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर, विजयानंद माने, प्रविण म्हात्रे, मधुकर राऊत व जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आदी उपस्थित होते. 

महिला व युवा मुलींना शिक्षणासोबत रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी दोन वर्षापूर्वी डीबीएस महिला दक्षता पथकाची तसेच दिपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टची स्थापनाही त्यांनी केली आहे. विविध घटकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न त्याव्दारे केला जात आहे. दरम्यान, नवी मुंबई डीबीएस महिला पथक अध्यक्ष पदाची जबाबदारी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी वैशाली घोरपडे यांच्यावर सोपविण्यात आली असून महिला दक्षता पथकांना यावेळी नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार असून येत्या काळात 9 शाखांचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत एका पित्याने बलात्कार्‍यावर गोळ्या झाडल्या. बलात्कार्‍यांना अशीच शिक्षा मिळाल्या तर हे प्रकार थांबतील असेही त्या म्हणाल्या.