बेलापूर (वार्ताहर) - प्रलंबीत कामांची बिले मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून तीस हजार रुपयांची लाच घेतांना ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी सिडकोचे कार्यकारी अभियंता कल्याण पाटील यांना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, सीबीडी पोलिसांनी काल शुक्रवारी पाटील यांना विशेष न्यायालयात हजर केले असता, 24 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण उत्तम पाटील (57), कार्यकारी अभियंता (पी.पी.अँड क्यु) (वर्ग-1) शहर व औद्योगिक विकास महामंडळ, रायगड भवन से-11 सीबीडी असे लाचप्रकरणी अटक केलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता कल्याण पाटील यांनी सदरची लाचेची रक्कम त्यांच्या स्वत:च्या नावे असलेल्या एमएच-46- पी-2456 या चारचाकी वाहनातून एमजीएम हॉस्पीटलच्या पाठीमागे गेटसमोर सीबीडी येथे ठेकेदाराकडून स्विकारली असल्याचे एसीबीच्या सापळा कारवाईतून निष्पन्न झाले आहे.