पनवेल (प्रतिनिधी) - पनवेलकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पनवेल महापालिकेतर्फे सोमवारपासून कोरोना बाधित रूग्णांना वेबेक्स अँपच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य कृती दलाच्या सदस्यांकडून ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन मिळण्याची सोय उपलब्ध झाली असून काल या कार्यक्रमाचे उद्घाटन फोर्टीस रुग्णालय, मुलुंड येथील डॉ. राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
विलगीकरणामधल्या रूग्णांना मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. रूग्णांनी स्वत: स्वत:चे उपचार करू नका, डॉक्टरांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे. आयसीएमआरच्या गाईडलाईन्स प्रमाणे उपचार करणे गरजेचे आहे. विलगीकरणातील रूग्णांनी कशी काळजी घेतली पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे या सर्वांचे मार्गदर्शन या उपक्रमामधून होणार असल्याचे राज्य् कृती दलाचे सदस्य फोर्टिस रूग्णालय मुलूंड येथील डॉ. राहूल पंडित यांनी कोविड-19 रूग्णांना जनजागृतीसाठी ऑनलाईन विशेष मार्गदर्शक सत्राचे उद्घाटन करताना सांगितले.
यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, डॉ. चारूदत्त वैती, डॉ. बिंदू, डॉ. सखाराम गराळे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याचे जाहीर करत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या तिसर्या लाटेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. विलगीकरणामधील रूग्णांना आवश्यक ती माहिती या वेबीनारच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे सांगितले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या लाटेत नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून या वेबीनारमुळे जनजागृती व फायदा होणार असल्याचे सांगितले. आयुक्त गणेश देशमुख यांनी रूग्णांनी आपल्या मनानी औषधे न घेता आपल्या नजिकच्या महापालिकेच्या किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक,तज्ञ डॉक्टरांकडे जावे. त्यांच्या सल्ल्यांनेच औषधे घ्यावी. यासाठीच या वेबीनारचे आयोजन केले असून विलगीकरणामधल्या रूग्णांना पहिल्या दिवसापासून डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे सांगितले. रोज हे वेबीनार दिवसातून चार-पाच वेळा होणार असून प्रत्येक सत्र दोन तासाने मराठी व हिंदीमध्ये होणार असल्याचे सांगितले. डॉ. सखाराम गराळे यांनी उद्घाटनानंतर पॉझीटिव्ह रूग्णांसाठीच्या पहिल्या मार्गदर्शक सत्रांमध्ये कोविड झाल्यावर घ्यावयाची काळजी, घ्यावयाचा आहार अशी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाला मुख्यालय आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी , कोविड पॉझीटिव्ह रूग्ण ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.