दारूच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी!


नवी मुंबई (प्रतिनिधी)- थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशननिमित्त काल नवी मुंबईतील बहूतांश ठिकाणच्या दारू दुकानांसमोर तळीरामांनी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. विशेष म्हणजे यानिमित्त सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. 

कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटमुळे संपूर्ण राज्यात शासनातर्फे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे याबाबत कडक नियमावली करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर काल दारू खरेदी करण्यासाठी मदिरा प्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती. यात कोरोनाच्या नियमांचा वाईनशॉप मालकांसह तळीरामांनाही चांगलाच विसर पडला असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करणार्‍या दारू दुकानांवर संबंधित यंत्रणांकडून  कारवाई होणार का ? का केवळ शासनाचे नियम सर्व सामान्य नागरिकंासाठीच आहेत असा सवाल यानिमित्ताने जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.