हिंदू युवकाने सीपीआर देऊन वाचविले मुस्लिम युवकाचे प्राण

 


खारघर (प्रतिनिधी) - हिंदू युवकाने सीपीआर देऊन वाचविले मुस्लिम युवकाचे प्राण  वाचविण्याचे कार्य करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

डॉक्टरांना आपण देव मानतो, कारण जात धर्म वर्ण न बघता ते रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणतात. परंतु माणूस जेव्हा ठणठणीत बरा होतो तो पुन्हा जात धर्म वर्ण भेदाच्या फेर्‍यात गुरफटतो. पंरतु खारघर नवी मुंबई इथे घडलेल्या एका घटनेने याला छेद दिला आहे. सचिन साळुंखे हे खारघर स्वप्नपूर्ती यथे राहत असून ते तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये बिलिंग विभागात कार्यरत आहेत. स्वप्नपूर्ती इथे 25 डिसेंबरला मॉर्निग वॉक करीत असतांना अचानक एक इसम कोलमडून खाली पडला, आजूबाजूला जास्त नागरिक नसल्यामुळे त्याची दखल कोणी घेतली नाही. परंतु तळमजल्यावर राहत असलेले सचिन साळुंखे हे त्या व्यक्तीच्या मदतीला धावून आले व त्यांनी तात्काळ सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचविले. सीपीआर दिल्यानंतर तो इसम थोडा शुद्धीवर आला. लगेच त्याच्या मोबाइलवरून घरच्या मंडळींना कळविण्यात आले व पुढील तपासणीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. व त्या व्यक्तीचे नाव होते जफर रसूल खान आता जफर हे पुन्हा घरी आले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असून त्यांना फिट आली होती. जाफर हे वयाने तरुण असून ते एकमेव कुटुंबातील कमावते व्यक्ती आहेत. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये आम्हाला नियमित सीपीआर चे प्रशिक्षण दिले जाते व त्याचा फायदा मला या नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी झाला असल्याचे याविषयी बोलतांना सचिन साळुंखे यांनी सांगितले.

मधुमेह, उच्चरक्तदाब, फास्टफूड खाद्य संस्कृतीची क्रेझ, मानसिक ताणतणाव आदी कारणांमुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहे. हृदयविकार झालेल्या अनेक रुग्णांना आपल्याला हृदयविकार आहे याचीच जाणीव नसते. त्यामुळे कधीकधी अचानक रस्त्यामध्ये हार्ट अटॅक येणे, प्रवासामध्ये चक्कर येणे अथवा अचानक हृदय प्रक्रिया बंद पडणे, असे प्रकार घडतात. अशावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना नक्की काय उपचार करावे? याची माहिती नसते आणि त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याआधीच तो मरण पावतो. अशावेळी हे सीपीआर प्रशिक्षण खूप उपयोगी पडते अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे जेष्ठ डीजीएम संतोष साईल यांनी दिली.