शहरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई मनपाच्या धर्तीवर पर्याय स्विकारण्याची गरज

 


मुंबई (प्रतिनिधी)- शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी ’ईज ऑफ लिव्हिंग’ उपक्रमात सुचवण्यात आलेले उपाय राज्यातील सर्व महापालिकांमध्ये राबवण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. हे उपाय शहरांचे रूप पालटून टाकण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी गरज वाटल्यास या महानगरपालिकांना नगरविकास विभागाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने व्हाट्सऍप चॅट बॉट आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे सुरक्षित शाळा उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात या बैठकीला बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आठ दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वतीने व्हॉट्सएप चॅट बॉट या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन सुविधेमार्फत तब्बल 80 सुविधा चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने सुरू केलेला हा प्रकल्प इतर महानगरपालिकांनी देखील राबवावा यासाठी काल या सुविधेचे सादरीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या चॅटबॉटमुळे उत्तम सेवा नागरिकांना पुरविता येणार असून त्यामुळे कामकाजाला गती मिळेल, शिवाय पारदर्शकता वाढीस लागणार असून नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणार आहे. मुंबई महापालिकेने सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून हे चॅटबॉट जनतेला सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  

तर दुसरीकडे राज्याचे वेगाने नागरीकरण होत असताना होणारा विकास हा शाश्वत व्हावा तसेच ’इज ऑफ लिव्हिंग’मध्ये तो बदलण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनाचा आढावा वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या संस्थेने सादर केलेल्या सादरीकरणातून मांडण्यात आला. शहरातील शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी अनेक संकल्पना यावेळी सादर करण्यात आल्या. या संकल्पना अत्यंत साध्या आणि सोप्या असून त्याद्वारे शहरांतर्गत नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. असे प्रकल्प राज्यातील महानगरपालिकामध्ये राबवणे शक्य असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने कालबद्ध रीतीने काम करावे लागणार आहे. त्यासाठी नगरविकास विभाग पुढाकार घ्यायला तयार असून महानगरपालिकाना काही निधी द्यायला देखील तयार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. काल सादर झालेल्या या संकल्पनांचे नगर रचनाकारांच्या मदतीने शैक्षणिक संस्थांचा परिसर सुरक्षित करण्यासाठी काम करावे असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना केले.