नवी मुंबईत वाहनचोरी ठरतेयं पोलिसांची डोकेदुखी

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - शहरात दिवसेंदिवस पार्क केलेल्या वाहने चोरीस जाण्याच्या घटनांत वाढ होतांना दिसत आहे. दुचाकीसह इतर वाहने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस जाण्याच्या घटनांची नोंद पोलिस दप्तरी होतांना दिसत आहेत. या वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे वाहनधारक नागरिकांचे मोठे नूकसान होत असून पोलिसांनी वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. बाजारपेठ, मोकळी जागा, पार्किंग, मैदानाबाहेरून चोरीला जाणारी वाहने आता नवी मुंबईकरांचीडोकेदुखी ठरत आहे. या घटनांमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे.

वाहनचोरीच्या सीबीडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेत, सीबीडी से-11 मध्ये राहणार्‍या रत्ना शिवदास नायर नावाच्या महिलेने आपली मारुती वेगनॉर कार क्र.(एच एच 06/ए बी/5198) ही राहते सोसायटीच्या बाहेरील रोडच्या बाजुला उभी करुन ठेवली असता, अज्ञाताने त्यांची कार चोरुन नेली.याबाबत सदर महिलेने सीबीडी पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे.

दुसर्‍या घटनेत, शुभम रमेश गावंड नावाच्या रायगडमधील तरूणाने आपली दुचाकी से-11,सीबीडी याठिकाणी उभी केली असता अज्ञाताने त्याची दुचाकी चोरून नेली आहे.याबाबतची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

रबाळेतील वाहनचोरीच्या घटनांत, ऐरोलीतील राजेश वासू पुजारी नावाच्या तरूणाने आपली अँक्टीवा स्कुटी ऐरोली रेल्वे स्टेशन समोरील रोड परिसरात पार्क केली असता अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी चोरुन नेली आहे. तसेच घणसोली अर्जुनवाडी येथे राहणार्‍या हितेश दिलीप वैरागड याची दुचाकी राहते सोसायटीच्या परिसरातून चोरीस गेली आहे. या दोन्ही घटनांची नोंद रबाळे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेत, दिघोडे येथे राहणार्‍या राजेंद्र मोतिराम पाटील नावाच्या रिक्षाचालकाने आपली एम.एच-46-ए.झेड-2128 या क्रमांकाची रिक्षा हुतात्मा स्मारक समोर दिघोडे येथे पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने सदरची रिक्षा चोरुन नेली. तर कोपरखैरण्यातील घटनेत, घणसोलीत राहणार्‍या प्रलय विठठल पराड नावाच्या तरुणाच्या ताब्यातील इको गाडीतील  सिल्वर रंगाचे सायलेन्सर हे अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे. या घटनेची नोंद कोपरखैरणे पोलिस ठाण्यात झाली आहे. तर संजय गांधीनगर मधील रिक्षाचालक  दयाशंकर चौधरी याने आपली रिक्षा  रहिम टिंबर मार्ट संजय गांधी नगर समोरील रस्त्यावर पार्क केली असता, अज्ञाताने सदरची रिक्षा चोरून नेली आहे. या घटनेची नोंद रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. खांदेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही अविनाश शिंदे नावाच्या रिक्षाचालकाची रिक्षा चोरीस गेली आहे. शिंदे यांनी आपली रिक्षा दि.18 जानेवारी रोजी राहते बिल्डींगचे खाली पार्क केली असता, अज्ञात चोरटयाने सदरची रिक्षा चोरुन नेली आहे.

कामोठे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेत, भांडूप येथे राहणार्‍या फुलचंद रामचंद्र यादव नावाच्या गृहस्थाने आपली दुचाकी मानसरोवर रेल्वे स्टेशन येथील मोकळया पार्कींगमध्ये पार्क करुन ठेवली असता अज्ञाताने सदरची दुचाकी चोरून नेली आहे.