स्टेडियम उभारुन चालणार नाही, फुटबॉल वर्ल्डकपमध्ये दरारा निर्माण व्हावा -उद्धव ठाकरे

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व्हर्च्युअल पद्धतीने या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच ठिकाणी सर्व खेळांसाठीचं व्यासपीठ तयार झालं आहे, याचा खूप आनंद आहे. अशी व्यवस्था असणारं कदाचित महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य असावं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मला फुटबॉलचं फार ज्ञान नाही, मात्र आदित्य ठाकरे यांना फुटबॉल खेळायला आवडतं, तेजस ठाकरे तर मोठ्या स्तरावर फुटबॉल खेळला आहे. या दोघांमुळे अनेकदा फुटबॉलचे सामने पाहायला मिळाले आहेत. अनेकदा सामने पाहायला जाणं व्हायचं. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, फुटबॉल हा केवळ पायाने खेळायचा खेळ नव्हे, यात देखील बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. जितका बुद्धीबळ खेळताना करावा लागतो तितकाच यातदेखील बुद्धीचा वापर होतो.   मुख्यमंत्री म्हणाले की, या मैदानावर खेळून अनेक चांगले फुटबॉलपटू घडतील, अशी मला अपेक्षा आहे. तसेच नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही, भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन तिथे भारताचा दरारा निर्माण व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तसेच लवकरच या मैदानावर महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा-2022 होतेय, त्यासाठी शुभेच्छा. आपला संघ यात चांगली कामगिरी करेल, अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.

कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांनी महिला आशिया चषक भारत 2022 स्पर्धेच्या स्थानिक कार्यक्रमासाठी सुरक्षा प्रोटोकॉलवर चर्चा केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सचिव कुशल दास आणि इतर महत्त्वाच्या अधिकार्‍यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीची पाहणी केली आणि स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सविस्तर योजना आखण्यात आली आहे. सर्व सहभागींना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान केली जाईल.