पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक बेड्स सुविधांची आयुक्तांकडून पाहणी

 


ठाणे (प्रतिनिधी) - कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड ग्रस्त लहान मुलांना अत्यावश्यक औषधोपचार तात्काळ मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 50 पेडियाट्रिक आयसीयू आणि 50 पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्स सुविधांची काल महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. 

या पाहणी दौर्‍यास अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, कार्यकारी अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर, डॉ. रोहित महावरकर, समन्वयक आधार कुलकर्णी आदी उपस्थित होते.कोरोनाची वाढती तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे व त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे ठाणे महापालिका आयुक्त हे बारकाईने लक्ष देत आहेत. त्यानुसार महापालिकेने पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावर लहान मुलांसाठी पेडियाट्रिक आयसीयू कक्ष निर्माण करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कक्षाची स्थापत्य, विद्युत आणि ऑक्सिजन सुविधेसह इतर सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. 

पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे यापूर्वी व्हेंटिलेटरसहित 206 आयसीयू बेड्स आणि 883 ऑक्सिजन बेडस कार्यान्वित आहेत. यामध्ये कोविड ग्रस्त लहान मुलांना अत्यावश्यक औषधोचार सुविधा तात्काळ मिळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी सुविधांनीयुक्त सुसज्ज असे 50 पेडियाट्रिक आयसीयू आणि 50 पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी विशेष कक्ष व मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया तयार करण्यात आला आहे. या सर्व सुविधांची महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली.