एकूण 1691 चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये तर 44 वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत करतांना दारू पिऊन वाहने चालविणार्यां तळीरामांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांची झिंग उतरवली आहे. यात नवी मुंंबई पोलिस आयुक्तालयातील 16 वाहतूक शाखांकडून एकूण 1691 चालकांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये तसेच 44 वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करतांना होणार्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह पोलिस आयुक्त डॉ. जय जाधव व नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्यासह वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा ताफा पहाटे साडे पाच वाजेपर्यंत रस्त्यांवर तैनात होता. याचे फलित म्हणून यावेळी नवी मुंबईत कुणाचाही अपघाती घटनेत बळी जाण्याची घटना घडली नाही.
थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करताना अनेक जण पार्ट्या झाल्यानंतर दारूच्या नशेत आपल्या वाहनाने घरी जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने मागील काही वर्षांपासून अशा तळीरामांवर वाहतूक पोलिसांकडून थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहिमेदरम्यान कारवाई केली जाते. त्यानुसार थर्टी फर्स्टच्या दिवशी नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी लावलेल्या जाळयात वाहतूकीचे नियम न पाळणार्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. यात एकूण 1691 चालकांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये तसेच 44 वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दरवषी ड्रंक अॅण्ड ड्रईव्हची मोहिम राबवितांना, वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ ऍनालायझर मशिनचा वापर केला जातो. मात्र कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटचा धोका पाहता, थर्टी फर्स्टच्या दिवशी ड्रंक अॅण्ड ड्रईव्हची मोहिम राबवितांना वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ ऍनालायझर मशिनचा वापर न करता, वैद्यकीय तपासणी करून आलेल्या अहवालावरून दोषी आढळलेल्या व्यक्तींवर सदरची ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणार्या पामबीच मार्गावरील अपघाती घटना पाहता, याठिकाणी वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष पुरविण्यात आले होते. त्यानुसार पामबीच मार्गावर मोराज सर्कल, एनआरआय, से-50 या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली होती.
दरम्यान, नवी मुंबईत वाहतूक नियमांची पायमल्ली करून बेेजबाबदारपणे वाहन चालविणार्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असून यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास वाहतूक विभागास सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे.