बेलापूर (वार्ताहर) - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीतील धर्मस्थळे तसेच महत्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. त्याशिवाय पोलीस ठाणे व वाहतुक पोलिसांकडून शहरातील प्रत्येक चौकात नाकाबंदीद्वारे वाहनांची तपासणी करुन संशयीत वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यासाठी पोलीस ठाणे स्तरावरील कर्मचारी, वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 20 पोलीस ठाणे स्तरावर तसेच वाहतूक विभागाकडून 20 ठिकाणी नाकाबंदी चेकींग पॉईंट लावण्यासह चौका चौकात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतुक पोलिसांकडून शहरातील अंतर्गत रस्त्यावर तसेच शहारात येणार्या-जाणार्या सर्व रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात येणार असून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती, संशयित वाहन, अफवा पसरविणारे, आदींची माहिती स्थानिक पोलिसांना अथवा नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर त्वरित देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.