जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात नवीन कपड्यांच्या खरेदीत सवलत!


 नवी मुंबई (प्र्रतिनिधी) -  स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना ’थ्री आर’ प्रणालीचा म्हणजेच कचरा कमी करणे,   कचर्‍याचा पुनर्वापर आणि कचर्‍यावर पुनर्प्राक्रिया या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून अशा प्रकारचे उपक्रम राबविणार्‍या संस्था, आस्थापना यांना प्रोत्साहितही केले जात आहे.

एच अ‍ॅण्ड एम या रेडीमेड कपड्यांच्या जगप्रसिध्द ब्रॅडच्यावतीने अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे.यात आपल्या घरातील जुने कपडे एच अ‍ॅण्ड एमच्या दुकानात देऊन त्या बदल्यात तेथून खरेदी करण्यात येणार्‍या नव्या कपडयांवर सवलत दिली जात आहे. थ्री आर मधील पुनर्वापर संकल्पनेला पूरक असणारा हा अभिनव उपक्रम असून या उपक्रमाला नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रोत्साहीत करण्यात येत आहे.

सीवूड नेरुळ येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये असलेल्या एन अ‍ॅण्ड एमच्या शोरूममध्ये आपल्या घरातून पिशवीत भरून आणलेले जूने कपडे ठेवण्यासाठी विशिष्ट बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. सदर बॉक्समध्ये जुन्या कपड्यांची पिशवी टाकल्यानंतर बॉक्सवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर खरेदी करण्यात येणार्‍या कपड्यांवर सवलतीचे कुपन दिले जात आहे. हा उपक्रम सर्वार्थाने ’थ्री आर’ संकल्पनेला पूरक असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार या अभिनव उपक्रमाची नवी मुंबई महापालिकेमार्फतही प्रसिध्दी केली जाणार आहे.