नवी मुंबई (प्रतिनिधी) - ’स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना ’माझं शहर - माझा सहभाग’ हे घोषवाक्य नजरेसमोर ठेवत ’नागरिकांना प्राधान्य’ या उद्दिष्टपूर्तीकरिता लोकसहभागाची व्यापकता वाढविणारे उपक्रम महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यावर भर दिला जात आहे. अशाच प्रकारचा ’शून्य कचरा उपक्रम’ जुईनगर येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी कोव्हीड नियमांच्या चौकटीत उत्साहात संपन्न झाला. या सप्ताहाच्या पारायणामध्ये सहभागी भाविकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर मर्यादा राखण्यात आली असून याठिकाणी कोव्हीड नियमावलीप्रमाणेच स्वच्छतेचेही काटेकोर पालन करण्यात आले.
यामध्ये विशेषत्वाने सप्ताहात सहभागी निवडक भाविकांची भोजन व्यवस्था पर्यावरणशीलता जपत केळीच्या पानावर करण्यात आली होती. याशिवाय मंडपातील स्वच्छतेवरही विशेष लक्ष देण्यात आले होते. पाणी, ओलसर पदार्थ व चहासाठी पेपर ग्लास व द्रोणचा वापर करण्यात आला. अगदी याठिकाणचे बॅनरही पारंपारिक पध्दतीने कापडाचे होते.
सप्ताहाच्या मंडपामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करा असा संदेश प्रसारित करण्यासाठी मोठ्या आकारातील कापडी पिशवी प्रदर्शित करण्यात आली होती. ओला व सुका कचरा घारापासूनच वेगवेगळा देण्याचा संदेश प्रसारणासाठी कार्टुनच्या वेशभूषेत कचरा डबे स्वरूपातील लक्षवेधी मॅस्कॉट बनविण्यात आले होते. सप्ताहाच्या कार्यक्रमात पुन्हा वापरण्यायोग्य कापडी मास्क, कापडी पिशव्या तसेच पर्यावरणशील तुळशीच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे महापालिका नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विभाग अधिकारी भरत धांडे, स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक विजेंद्र पवार, अभियंता वैभव देशमुख यांच्यासह याठिकाणी भेट देत स्वच्छता उपक्रमात स्वत:हून उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याबद्दल आभार मानले तसेच स्वच्छतेमध्ये कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून सहभाग वाढवावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती व वसुंधरा रक्षण संवर्धनाची शपथ घेतली.