पनवेल (प्रतिनिधी) - नैना प्रकल्पा विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले आहेत. शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काल तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील आदी प्रमुख नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे. नैनामध्ये ज्या गावाची जागा गेली आहे त्यांना त्याच गावात जागा द्या अन्य गावात जागा कशाला देता, हे सर्व बेटरमेंट चार्ज मिळण्यासाठी केले जात असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. आपला फायदा करून घ्यायचा असेल तर संघटना मजबूत झाली पाहिजे. घरात बसून राहिलो तर नुकसान होईल, आपण सारे पेटून उठलो पाहिजे आणि या सरकारला घाम फोडला पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. नैनाचा कारभार नियोजनशून्य असल्याचा आरोप शेतकर्यांच्यावतीने यावेळी करण्यात आला.नैना म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास मात्र शेतकर्यांना भकास करणारा हा प्रकल्प आहे. यावेळी नैनाविरोधात एकत्र लढलो तर नक्कीच यश मिळेल. असे अॅड.विजय गडगे यांनी सांगितले. शासन झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांना घरे देत आहेत मात्र घरात राहणार्यांना उध्वस्त करून झोपडीत राहायला पाठवणार आहे का असा सवाल यावेळी उपस्थितांमधून राज्य सरकारला करण्यात आला. मुंबईचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई उभी राहिली. तेव्हा स्थानिक आगरी - कोळी भूमीपुत्रांच्या जमिनी सिडकोने कवडीमोल भावाने खरेदी केल्या. त्याबदल्यात आपल्याला काय मिळाले? हे जरा मागे डोकावून पाहिल्यास समजेल. आता नवी मुंबई देखील कमी पडू लागल्याने तिचा भार कमी करण्यासाठी नैना’चा जन्म झाला. सिडको हे नाव जनमानसात प्रचंड बदनाम झाल्याने नैना’ हे गोंडस नाव देण्यात आले. नवी मुंबईच्या निर्मितीमध्ये भूमीपुत्रांचा त्याग मोठा आहे. तिसर्या मुंबईच्या उभारणीमध्ये तर स्थानिकांवर अक्षरशः दडपशाही सुरू आहे. नैना’ आली तेव्हा सक्तीचे कमीत कमी भूसंपादन असे धोरण ठरले होते. आता स्थानिकांचे व्यवसाय मोडीत काढून, लाखो रुपये भरण्यास सांगून त्यांच्या जमिनी सक्तीने विकत घेण्याचा डाव रचला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत, पोलीस बळाचा वापर केला जात आहे. जेणेकरुन स्थानिक हतबल होऊन गुडघे टेकतील. त्यामुळे गावोगावी नैना विरोधी असंतोष खदखदत आहे. शेतकर्यांच्या जमिनीवर जाणूनबुजून आरक्षण टाकले असल्याचा आरोप केला जात आहे.
यावेळी पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, सुरेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, प्रज्योती म्हात्रे, अनुराधा ठोकळ, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.