स्वच्छताविषयक विविध स्पर्धात्मक उपक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


 नवी मुंंबई (प्रतिनिधी) - आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना नागरिकांचा स्वच्छता कार्यात सहभाग वाढावा याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतर्फे  विशेष लक्ष दिले जात असून स्वच्छताविषयक विविध उपक्रमही राबविले जात आहेत.  नवी मुंबई महापालिकेच्यावतीने आयोजित स्वच्छताविषयक विविध स्पर्धात्मक उपक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ कोव्हीड प्रतिबंधात्मक नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करीत मोजक्या उपस्थितीत महापालिका मु्ख्यालयातील अ‍ॅम्फिथिएटरमध्ये नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सांगितले की, यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट ’नागरिकांना प्राधान्य’ असे असून त्यादृष्टीने ’माझे शहर - माझा सहभाग’ हे आपले घोषवाक्य आहे. केंद्र सरकारमार्फत नागरिकांचे शहर स्वच्छतेविषयीचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आलेले दूरध्वनी उचलावेत आणि त्यावर विचारल्या जाणार्‍या स्वच्छताविषयक प्रश्नांना सकारात्मक उत्तरे द्यावीत आणि आपल्या शहराला सिटिझन फिडबॅक कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याकरिता कटिबंध्द रहावे असे आवाहन केले.

याप्रसंगी उपआयुक्त मनोजकुमार महाले, मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र सोनावणे, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव, स्वच्छता अधिकारी राजेंद्र अंगळे, सुषमा पवार, सुधाकर वडजे, दिनेश वाघुळदे, संतोष देवरस,नितीन महाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छ सोसायटी स्पर्धेत एसबीआय सोसायटी नेरूळ हे प्रथम तसेच त्रिशूल गोल्ड कोस्ट सोसायटी घणसोली हे व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. वाशी येथील फोर पॉईंट हॉटेलने प्रथम आणि विस्टा इन हॉटेलने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. वाशीचे महाराजा मार्केट हे प्रथम तसेच कोपरखैरणे येथील श्रमिक जनता फेरीवाला असो. हे स्वच्छ मार्केट स्पर्धेचे व्दितीय क्रमांकाचे विजेते ठरले. स्वच्छ रूग्णालयाबाबत हिरानंदानी हॉस्पिटल वाशी यांनी प्रथम तर कोपरखैरणे येथील लायन्स हॉस्पिटल यांनी व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक स्विकारले. महानगरपालिकेच्या स्वच्छ शाळांमध्ये आंबेडकरनगर रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55 हे प्रथम आणि सानपाडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर शाळा क्र. 116 हे व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, तर खाजगी शाळांमध्ये डीपीएस स्कुल नेरूळ प्रथम तसेच रिलायन्स फाऊंडेशन स्कुल कोपरखैरणे विजेते व उपविजेते ठरले. ऐरोली येथील जैवविविधता केंद्र हे प्रथम क्रमांकाच्या तसेच बेलापूर येथील भारतीय कपास निगम व्दितीय क्रमांकाच्या स्वच्छ शासकीय कार्यालय पुरस्काराचे मानकरी ठरले.

स्वच्छ चित्रकला स्पर्धेत राम प्रतिक गोरखनाथ, कुणाल सुधीर इटवेकर, खुशबू जितेंद्र यादव हे अनुक्रमे तीन क्रमांकाचे विजेते ठरले. स्वच्छ भित्तीचित्र स्पर्धेत युवराज कोळी, इशा बांडेकर, रूपम सिंग यांनी अनुक्रमे 3 पारितोषिके पटकाविली. स्वच्छ पथनाट्य स्पर्धेत सत्कर्व समुह प्रथम क्रमांक तसेच नाट्य रूची कलामंच व्दितीय आणि मुक्तछंद नाट्यसंस्था तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. स्वच्छ जिंगल स्पर्धेत प्रितेश मांजलकर, कृष्णा देवा आणि महेश मारू यांनी अनुक्रमे 3 पारितोषिके पटकाविली. त्याचप्रमाणे स्वच्छ शॉर्टफिल्म्स स्पर्धेतही बॉटल द डस्टबिन, कोलाज आणि परंपरा हे 3 लघुपट प्रथम 3 क्रमांकाचे मानकरी ठरले. याप्रसंगी उपस्थितांनी स्वच्छतेची तसेच माझी वसुंधरा रक्षण-संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण केली.