महापालिकेच्या धडक कारवाया! दिघ्यात पान टपरी हटाव मोहिम तर गोठिवली, घणसोलीत बेकायदा बांधकामांवर हातोडा

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहिम हाती घेतली असून काल घणसोली व ऐरोली विभाग कार्यक्षेत्रात धडक कारवाया करण्यात आल्या. यात दिघा यादवनगर येथे अनधिकृतपणे रस्ते व फुटपाथवर तसेच रेस्टॉरंटच्या बाहेर समासी जागेत सुरु असलेल्या सिगारेट व पान टपरी व्यावसायिकांविरोधात पानटपरी हटाव मोहिमेचे आयोजन करून त्या हटविण्या आल्या. तर घणसोलीत बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रातील से 09, 16, 19 व 20 तसेच दिघ्यातील यादवनगर येथे अनधिकृतपणे रस्ते व फुटपाथवर तसेच रेस्टॉरंटच्या बाहेर समासी जागेत सिगारेट व पान टपरी यांचे व्यवसाय सुरु होते.या अनधिकृत सिगारेट व पान विक्रेत्यांवर विभागामार्फत पानटपरी हटाव मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईमध्ये रेस्टॉरंटच्या समासी जागेतील 02 स्टील काऊंटर, 08 पानटपरी काऊंटर, 03 हातगाडी, नाशीवंत भाजापाला व इतर सामान जप्त करून ते कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी 08 मजूर, 3 पिकअप व्हॅन असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता. जी विभाग ऐरोली कार्यालयातील अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी, अतिक्रमण विभागातील पोलिस पथक व  आणि सुरक्षारक्षक यांचेमार्फत ही कारवाई करण्यात आली. 

ऐरोलीसह घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील सत्यवान नगर, गोठिवली या ठिकाणी आरसीसी जोत्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते तसेच सितारामवाडी सार्वजनिक शौचालयाजवळ घणसोली गांव, याठिकाणी तळमजला आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते. या दोघांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकमांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.त्यामुळे काल अखेरीस सदरची बांधकामे हटविण्यात आली.या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी व कर्मचारी, मजुर-11, जेसीबी-1, ब्रेकर-2, कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.