काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्षांना भाजपच्या माजी नगरसेवकाकडून जीवे मारण्याची धमकी!

 नेरुळ पोलिसांत अदखलपात्र स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद




नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अन्वर हवलदार यांच्या मोबाईल फोनवर भाजपाचे सीवूड दारावेतील माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार हवलदार यांनी नवी मुंबई पोलिसांकडे एका निवेदनाव्दारे केली असून या प्रकरणी पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबत हवलदार यांनी नेरुळ पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी सुनील पाटील यांच्याविरोधात कलम 506 अन्वये अदखलपात्र स्वरुपाच्या गुन्हयाची नोंद केली आहे.

यासंदर्भात नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अन्वर हवलदार यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालय परिमंंडळ-1 चे पोलिस उपायुक्त पानसरे यांची भेट घेवून त्यांना सादर केलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, नेरुळ प्रभाग क्र.92 चे माजी नगरसेवक सुनील बाळाराम पाटील यांनी दि. 12 जानेवारी 2022 रोजी मी माझ्या नेरुळ से-23 मधील कार्यालयात असतांना दुपारी 1 वाजून 21 मिनिटांच्या सुमारास माझ्या मोबाईलवर फोन केला व ’तू भूषण कडे पैशाची मागणी करतोय, तुझी एवढी हिम्मत की तु गाववाल्यांकडे पैसे मागतोस, तुझ्या ऑफिसला पोर घेवून येतो आणि तुझी मर्डरच करतो. अशा प्रकारे मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे अन्वर यांनी म्हटले आहे. खरंतर भूषण ही व्यक्ति कोण हेच मला माहीत नाही. आणि पैशा बद्दल माझे कुणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही. मी सुनील पाटील यांचा राजकीय विरोधक आहे. तसेच येणार्‍या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र.92 मधून मी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीत उमेदवार असणार आहे. मी प्रभागात करीत असलेली कामे करू नये म्हणून मला ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आहे. सदर व्यक्ती ही गुंड प्रवृत्तीची असल्याने येणार्‍या काळात माझ्यावर व माझ्या परिवारातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला व माझ्या कार्यालयाची नासधूस, माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला, बॅनर फाडणे असे गंभीर प्रकार होवू शकतात अशी भीतीही हवलदार यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली असून तसे झाल्यास त्याला सर्वस्वी सुनील बाळाराम पाटील हे जबाबदार राहतील. त्यामुळे पाटील यांना याप्रकरणी अटक करुन मला पुढील काळात होणार्‍या दहशत व त्रासापासून न्याय द्यावा अशी मागणी.


माझ्यावरील आरोप धादांत खोटा!

माझ्या प्रभागात स्वच्छता अभियानाअंतर्गत जाळी बसविण्याचे 8 लाखांचे काम स्थानिक तरुणाने घेतले आहे. मात्र सदर ठेकेदाराला विविध प्रकारे ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचे काम अन्वर हवलदार यांच्याकडून केले जात आहे. यापूर्वी त्यांना पैसेही दिले आहेत. मात्र पुन्हा त्यांच्याकडून ठेकेदाराकडे पैसे मागण्याचे सत्र सुरु झाल्याने यासंदर्भात अन्वर हवलदार यांची समजूत काढण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र जीवे मारण्याची धमकी देण्याचा माझ्याकडून कुठल्याही स्वरुपाचा प्रकार झाला नसून माझ्यावर करण्यात आलेला आरोप हा धादांत खोटा आहे. यासंदर्भात अन्वर हवलदार यांच्याविरोधात मी सुध्दा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.                                    - सुनील पाटील, माजी नगरसेवक प्रभाग क्र.92