लघुपटातून स्वच्छता संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद


नवी मुंबई (प्रतिनिधी)- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशातील मोठ्या शहरात प्रथम येण्याचा बहुमान संपादन केल्यानंतर हे श्रेय नागरिकांचे असल्याचे सांगत, 2022 या वर्षासाठीच्या स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जातांना स्वच्छतेविषयी नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न नवी मुंबई महानगरपालिका करीत आहे हीच प्रशंसा करण्यासारखी गोष्ट असल्याचे मत चित्रपट, मालिका, वेबसिरीज मधील लोकप्रिय कलावंत विजय निकम यांनी व्यक्त केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ च्या अनुषंगाने ‘नागरिकांना प्राधान्य’ हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून लोकसहभाग वाढीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित ‘लघुपट स्पर्धा’ अंतिम फेरीच्या परीक्षणप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले.  ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022 लघुपट स्पर्धा’ यामध्ये 33 संस्था, समुहांचे लघुपट प्राप्त झाले असून पहिल्या फेरीतून निवडलेल्या अंतिम फेरीसाठीच्या 11 लघुपटांचे सादरीकरण लघुपट निर्माते, दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाले. अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द अभिनेते विजय निकम आणि दृष्यम् चित्रपट तसेच लक्ष्य मालिकेतील नामवंत अभिनेते कमलेश सावंत यांनी केले. लघुपटासारख्या उपक्रमांमधून स्वच्छता कार्याला अधिक गती मिळेल व लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती होईल असा विश्वास यावेळी अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशन अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छता कार्यात नागरिकांचा सहभाग वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणजे ही लघुपट स्पर्धा असल्याचे सांगितले. याप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांची उपस्थिती होती.