लाचप्रकरणी फिटरसह तिघे एसीबीच्या जाळ्यात

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ येथील पाणी पुरवठा विभागातील फिटर मदन गणा पाटील (56 वर्षे) याच्यासह पोपट मारूती कांबळे (48) व विशाल कुमार वाघमारे (27) अशा तिघा जणांना तीन हजार रुपयांच्या लाचप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर तिघा जणांविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध (सुधारणा 2018) अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की, या प्रकरणातील तक्रारदार व त्यांच्या भावाचे घराचे अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करायचे होते. यासाठी फिटर मदन पाटील व एजंट पोपट कांबळे या दोघांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने ठाणे एसीबीने पडताळणी करून दि.5 जानेवारी रोजी सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून पोपट कांबळे व विशाल वाघमारे या दोघांनी लाच स्विकारल्याने, फिटर मदन पाटील याच्यासह एजंट पोपट कांबळे व विशाल वाघमारे अशा तिघांना एसीबीने रंगेहाथ पकडले. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणार्‍या लोकसेवकाबद्दल तक्रार करावयाची असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र दूरध्वनी क्र. 022- 20813598 / 20813599, टोल फ्री नं- 1064 अथवा व्हॉटसअ‍ॅप क्र. 9930997700 येथे संपर्क साधावा असे आवाहन ठाणे एसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे यांनी केले आहे.