ठाणे (प्रतिनिधी) - कोविड 19 मुळे गृह अलगीकरणात असणार्या ग्रामीण भागातील रुग्णांना ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत औषध किटचे वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्याहस्ते या औषध किटचे अनावरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, कृषि, पशु व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, समाजकल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरे, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे आदींसह जिल्हा परिषद सदस्य आणि विविध विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या औषध किटचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र आवश्यक असेल त्याच करोना बाधित रुग्णांना हे किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये ताप, अंगदुःखी यावरील गोळ्यांचे पाकिट, व्हिटॅमिन,मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या, तसेच सॅनिटायझर बॉटल आणि मास्क आदी 9 बाबींचा समावेश आहे. या औषध किटचा गृह अलगीकरणात असणार्या रुग्णांना घरीच उपचार घेण्यासाठी फायदा होणार आहे. असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले. दरम्यान किटमधील औषधे घेताना नजिकच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.