सिडको विविध टप्प्यावर जनतेकडून सुचना व हरकती मागविणार
नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाने खोपटा नव नगर अधिसूचित 32 गावांचा समावेश असलेल्या क्षेत्रासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, सिडकोने सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी व सुविधांनी परिपुर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याच्या इराद्याची सूचना प्रसिध्द् करण्यात आलेली आहे.
शहराचा विकास आराखडा तयार करतांना अस्तित्वातील असलेल्या गावांची वाढ लक्षात घेऊनच नियोजन करण्यात येईल. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या अधिनियमाप्रमाणे खोपटा अधिसुचित क्षेत्राचा विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली निर्धारित कालावधीत तयार करून विविध टप्प्यावर जनतेकडून सुचना व हरकती मागविण्यात येतील व सदर सुचनांवर योग्य तो विचार करून शासनास मंजूरीकरिता सादर करण्यात येईल. विकास आराखडा मंजूर केल्यानंतरच पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचे धोरण निश्चित केले जाईल असे सिडकोतर्फे यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
खोपटा नवनगर अधिसुचित क्षेत्राच्या विकासाचे उद्दिष्ट पायाभूत आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे व विकासाच्या विविध क्षेत्रात संधी निर्माण करणे आहे. एकात्मिक प्रोत्साहनार्थ विकास नियंत्रण नियमावली (युडीसीपीआर) नुसार खोपटा क्षेत्रातील 6 गावांचा मंजूर विकास आराखडा तसेच उर्वरित 26 गावांचा विकास आराखडा परस्पर सुसंगत असावा, यासाठी 26 गावांचा विकास आराखडा तयार करत असतांना 6 गावांच्या मंजूर असलेल्या विकास आराखड्याची फेरतपासणी करुन त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.