अश्विनी बिंद्रे हत्याकांड! तारखांना गैरहजर राहणार्‍या दोघा साक्षीदारांविरोधात जामीनपात्र वॉरंट

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)- बडतर्फे पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याचा तत्कालीन शासकीय पोलिस गाडीवरील चालक नरेंद्र कोरे याच्यासह बीएसएनएलचे नोडल ऑफिसर सत्यवान सिंग अशा दोघा साक्षीदारांविरोधात पनवेल सत्र न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावले आहेत.

 सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचे कामकाज शुक्रवारी पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात पार पडले. बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा तत्कालीन शासकीय पोलीस गाडीवरील चालक नरेंद्र काशिनाथ कोरे याला साक्षीसाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र आजारी असल्याचे कारण सांगून तो सलग चार तारखांना गैर हजर राहिला  म्हणुन विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यानी मेडिकल सर्टिफिकेटेची मागणी केली होती. मात्र त्याने ते हजर केले नाही. यावरून कोरे हा जाणीवपूर्वक कोर्टात साक्षीसाठी येत नाही म्हणून विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर चालक कोरे याच्याविरोधात बेलेबल वॉरंट काढावे अशी विनंती केली असता, पनवेल सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी आनंद यांनी त्यांची ही मागणी मान्य करत, चालक नरेंद्र कोरे याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहेत.

दरम्यान, बीएसएनएलचे तत्कालीन नोडल ऑफिसर असलेले सत्यवान सिंग यांची उत्तर प्रदेशमध्ये बदली झाली आहे. त्यामुळे ते ही वारंवार कोर्टात साक्षीसाठी येण्यास टाळाटाळ करीत आहे म्हणून विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी , बीएसएनएलचे नोडल ऑफिसर सत्यवान सिंग यांच्याविरोधातही न्यायालयास  बेलेबल वॉरंट काढण्याची विनंती केली. त्यानुसार सिंग यांनाही कोर्टाने जामीनपात्र वॉरंट बजावले आहेत.कालच्या सुनावणीप्रसंगी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यासह एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो, आरोपी आणि आरोपींचे वकील हजर होते. पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे.