ऐरोली (प्रतिनिधी) - मित्रासमवेत क्रिकेट खेळत असतांना झालेल्या वादातून दोघा भावांनी केलेल्या मारहाणीत रबाळे एमआयडीसी गौतमनगर येथील सतिश मिश्रा नावाच्या 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या मारहाणीमुळे सदर तरूणाचे सहा दात तुटले असुन जबड्यास फँ क्चर झाला आहे. याप्रकरणी तरुणाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मारहाण करणार्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सतिश रामलाल मिश्रा असे यातील जखमी मुलाचे नाव असून तो गौतमनगर राबाडा येथील रहिवाशी आहे तर ब्रिजेश राजेश राय व जयेश राजेश राय, रा. गौतमनगर राबाडा ,असे मारहाण करणार्या आरोपींची नावे आहेत. सतिश मिश्रा हा त्याचे मित्र असलेले जयेश राय व ब्रिजेश राय या दोघा भावांसह दि.26 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ,गौतम नगर मधील चैतन्य गगनगिरी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते.दरम्यान, क्रिकेट खेळत असताना सतिश याची जयेश राजेश राय याच्यासोबत शाब्दीक बाचाबाची होवुन भांडण झाले. त्यावेळी जयेश याने सतिश याच्या तोंडावर ठोसा मारल्याने त्याचे दात तुटुन तो जखमी झाला. यावेळी ब्रिजेश राय याने सतिश याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. सदरच्या या प्रकाराबाबतची माहिती सतिश याने आपल्या वडीलांना दिल्यानंतर त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जयेश राय व ब्रिजेश राय या दोघा भावांविरोधात भादंवि कलम 325, 34, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.