भाजप आ.मंदा म्हात्रे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांची भेट!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी व राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक मुद्यावरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद सुरु आहेत. राज्यातील भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे नवी मुंबईत आ.गणेश नाईक व आ. मंदा म्हात्रे यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत. मात्र भाजपमधील या दोन्ही आमदारांमध्ये पुन्हा एकदा शितयुध्द निर्माण होत असतांनाच आ. मंदा म्हात्रे यांनी काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईतील कार्यालयात जावून त्यांची भेटही घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.भाजपमध्ये येण्यापूर्वी आ. मंदा म्हात्रे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या. त्यानंतर दरम्यानच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी घडयाळाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. दरम्यान, एकेकाळी एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी समजले जाणारे आ. गणेश नाईक व आ. मंदा म्हात्रे हे दोघेही सध्या भाजपचे आमदार आहेत. मात्र एकाच पक्षात असतांनाही पुन्हा एकदा या उभयंतामध्ये शीतयुध्द रंगतांना दिसत आहे. नुकतीच रुग्णालय उभारणीच्या मुद्यावरून आ. मंदा म्हात्रे यांनी आ. गणेश नाईक यांचे नाव न घेता, त्यांच्यावर संतप्त स्वरुपात टिकास्त्र सोडले आहे. ही घटना ताजी असतांनाच,  आ. मंदा म्हात्रे या बर्‍याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा सध्या जोरात रंगली आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा केली असल्याचे समजते. मात्र या वेळी झालेल्या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान,आ. मंदा म्हात्रे यांनी विकासकामांसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जातंय. मात्र असं असलं तरी त्यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपच्या गोटात यानिमित्ताने खळबळं उडाल्याचंही समजतंय.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आ. मंदा म्हात्रे यांनी भाजपचे ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. गणेश नाईक यांच्यावर रुग्णालय उभारणीच्या मुद्यावरुन निशाणा साधला होता. त्यावरुन नवी मुंबईत भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे दिसून आले होते. त्यातच काल आ. मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या आ. मंदा म्हात्रे पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत की काय, अशी चर्चा यानिमित्ताने नवी मुंबईत रंगताना दिसत आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता पुढे आलेली नसून येत्या काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचेचे लक्ष लागून राहिले आहे.