मुंबई ते नवी मुंबई जलसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग!


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई ते मुंबई ही जलवाहतुक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या जलवाहतुकीच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्यावेळी या सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने त्यादृष्टीने शासकीय यंत्रणांकडून करावयाच्या उपाय योजनांसंदर्भातील हालचालीनी वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईकरांना नव वर्षांची ही भेट दिली जाणार आहे. त्यामुळे याबाबतचे श्रेय लाटण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

मुंबई आणि नवी मुंबई जलमार्गाने जोडण्यासाठी एप्रिल 2018 मध्ये नेरूळ जेट्टीच्या उभारणीला सिडकोतर्फे मंजुरी मिळाली. या जेटीवर सुमारे 111 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र वनविभागाची ना हरकत मिळण्यास जवळपास 16 महिन्यांचा विलंब लागला. त्यामुळे हे काम उशिराने सुरू झाले. अनेक अडथळे पार करून अखेरीस सुरु झालेले हे जेटीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.त्यानंतर मुंबई, नवी मुंबई आणि मांडवा ही पहिल्या टप्प्यातील जलवाहतूक सुरू होणार आहे. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे या कामांची गती मंदावली होती, मात्र आता पुन्हा काम वेगात सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे. 

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने जल प्रवासी वाहतुकीला विशेष प्राधान्य दिले आहे. मुंबई, ठाणे नवी मुंबई, अलिबाग व मांडवा या ठिकाणांना जोडणार्‍या जलवाहतुकी मधील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. जलवाहतूक सुरू झाल्यानंतर रस्ते मार्गाने होणारा अडीच तासांचा प्रवास आता थेट 25 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते मुंबई ही जलवाहतूक नवीन वर्षांत प्रारंभी सुरू करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने महाराष्ट्र सागरी मंडळाला एका पत्राद्वारे कामाबाबत विचारणा केली असून सागरी मंडळाने सर्व काम पूर्ण झाले असल्याचे कळविले असल्याचे सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते या जलवाहतुकीचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय यंत्रणांसह नेरुळ येथील जेट्टीला भेट देवून तेथील पाहणी केली.