नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी 2022 -23 वर्षाच्या अर्थसंकल्पात, महापालिकेने बेलापूर मतदारसंघाच्या विकास कामांसाठी एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
नवी मुंबई मनपाचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. बेलापूरच्या मतदारसंघात सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात तसेच प्रलंबित विकासकामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक निधीची तरतूद व्हावी, याठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसह मेडिकल कॉलेज निर्माण व्हावे, सीबीडी मध्ये मरिना प्रकल्प, महिला सक्षमीकरण करिता महिला भवन, विध्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी बाल भवन, सानपाडा येथे नियोजित सेंट्रल लायब्ररी, सिवूडस येथील ओल्ड एज होम मधील फर्निचर, ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरुळ मधील 30फुटी भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा, खेळाडूंसाठी शूटिंग रेंज प्रशिक्षण , कुस्तीचा आखाडा, भविष्यात मोरबे धरणाची उंची व खोली वाढवणे , नेरुळमधील महात्मा गांधी नगर मधील मुलांना शालेय शिक्षण मिळावे याकरिता बालवाडीची उभारणी ,सोलर पार्क उभारणी, प्रकल्पग्रस्त मुलांना शिक्षणासाठी 5 लाखाची शिष्यवृत्ती याशिवाय बेलापूरच्या विविध ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील घटकासाठी आर्थिक भरीव तरतूद करण्यासह कचर्यापासून खतनिर्मिती, पर्यावरण ग्रीन हाऊस, जेष्ठ नागरिक निवासी केंद्र, प्रकल्पग्रस्त मुलामुलींना स्वयंरोजगार केंद्र उभारणे, नेरुळमधील सायन्स सेंटर, आपत्कालीन संक्रमण शिबीर उभारणे, तुर्भे रेल्वे स्थानक उड्डाणपूल, आदी विकास कामे मार्गी लागावी यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.